रायगड - कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्याने, तसेच हवाई वाहतूक बंद झाल्याने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) देशातील अनेक राज्यातील नागरिक अडकले आहेत. युएईमध्ये अडकलेल्या देशवासियांसाठी 'अल अदील' समूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, 'मसालाकिंग' डॉ. धनंजय दातार यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या नागरिकांच्या विमान तिकिटांची आणि कोविड-१९ टेस्टच्या खर्चाची जबाबदारी डॉ. धनंजय दातार यांच्या कंपनीने उचलली आहे.
देशातील अनेक नागरिक हे संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) या ठिकाणी कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे युएई मधील अनेक नागरिकांचे काम बंद झाले आहे. काम बंद झाल्याने हातात पैसे नाही, त्यामुळे पुन्हा भारतात कसे यायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. त्यांची हीच समस्या मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी सोडवली आहे.
भारत आणि संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) या दोन्ही देशांतील विमानसेवा नुकतीच पूर्ववत झाली आहे. विमानाच्या तिकीटाचे बुकिंग व मायदेशी परतू इच्छिणाऱ्या भारतीयांनी कॉन्स्युलेटकडे नाव नोंदणीही सुरू केली आहे. मात्र लॉकडाऊनला तोंड देताना अनेक लोकांकडील पैसे संपून गेले आहेत. अशा गरजूंच्या तिकीट खर्चाचा तसेच त्यांच्या कोविड चाचणीच्या शुल्काचा वाटा डॉ. दातार उचलणार आहेत.
परदेशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेला पुढाकार संपूर्ण जगभरात अशा स्वरुपाचा सर्वांत मोठा व व्यापक उपक्रम आहे. कोविड साथीमुळे जगभर आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे. आखाती देशांत शिक्षण, रोजगार व पर्यटनासाठी गेलेले अनेक भारतीय लॉकडाऊनमुळे तेथेच अडकून पडले आहेत. यात नोकऱ्या गमावलेल्या कामगारांचे प्रमाणही मोठे आहे. हवाई वाहतूक बंद झाल्यामुळे या लोकांपुढील अडचणी आणखी वाढल्या होत्या. या स्थितीत आपल्या देशबांधवांना सामाजिक बांधीलकीच्या हेतूने सर्वतोपरी मदतीचा निश्चय मी व माझ्या समूहाने केला आहे, असे दातार म्हणाले.
“हे सहाय्य करताना आम्ही संबंधित यंत्रणांची मंजुरी घेऊनच समन्वय साधत आहोत आणि त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचेही कठोर पालन करत आहोत. यासंदर्भात मी संयुक्त अरब अमिरातीतील भारताचे कॉन्सुलेट जनरल श्री. विपुल यांच्याशी चर्चा केली आहे. या भारतीयांना मायदेशी परतण्यात सहकार्य करणाऱ्या सर्वांप्रती मी आभार व कृतज्ञता व्यक्त करतो.” असे मत दातार यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा : रायगड जिल्ह्याचे ई-पासेस पोर्टल राज्यासाठी ठरले उपयुक्त, राज्यभरातून 25 लाख नागरिकांनी केले अर्ज