रायगड - जिल्ह्यात पर्यटनाला वाव मिळावा यासाठी वरसोली आणि दिवेआगर या समुद्रकिनारी 'बीच शॅक' प्रकल्पाला प्रायोगिक तत्वावर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर आता शेतीविषयक पर्यटन जिल्ह्यात वाढावे, यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली. तसेच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन केले जाणार नसले तरी, कंटेन्मेंट झोनमध्ये कडक निर्बंध लागू केले जाणार असल्याचेही पालकमंत्री तटकरे यांनी सांगितले.
कोरोना साखळी तोडण्यासाठी पावले उचलणार
जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असून सर्वाधिक कोरोना रुग्ण हे पनवेल याठिकाणी वाढत आहेत. त्यामुळे पनवेल तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या प्रतिबंधित क्षेत्रात नियम कडक केले जाणार आहेत. तसेच प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक केले जाणार आहे. आपण अनलॉकमध्ये असल्याने पुन्हा संचारबंदी लागू केली जाऊ शकत नाही. मात्र, प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये नियम कडक केले जाणार असून त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत मिळेल, असे पालकमंत्री तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नुकसानग्रस्त बागायतदारांना वाढीव मदत मिळण्यासाठी प्रयत्नशील
निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या घराच्या नुकसान भरपाईचे वाटप सुरू असून बागायतदारांना मात्र भरपाई देण्यास सुरुवात झालेली नाही. रायगड जिल्ह्यात नारळ, सुपारी बागायतदारांची असलेली बाग ही गुंठ्यांत असल्याने हेक्टरी नुकसान भरपाई कमी मिळेल. त्यामुळे झाडामागे नुकसान भरपाई शासनाने द्यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आंबा आणि काजू बागायतदारांना नुकसान भरपाई दिली जात आहे. तसेच पूर्वीची रोजगार हमी योजना विशेष बाब म्हणून शासनाने जिल्ह्याला लागू केली आहे.
हेही वाचा - "आमचे सरकार दडपशाहीचे नव्हे लोकशाहीचे, ..विरोधकांनी दिलदारपणे आणि मनमोकळ्यापणे टीका करावी"