रायगड - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी दुपारी रायगड किल्ल्याला भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज जे स्वप्न घेऊन निघाले होते, ते स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज रायगडाला भेट दिली. यावेळी त्यांनी होळीच्या माळावरील शिवप्रतिमा, राजदरबार आणि जगदीश्वराचे घेतले. त्यांनी किल्ल्याची पाहणी केली. यावेळी रायगडावर आलेल्या शिवप्रेमी पर्यटकांची आस्थापुर्वक चौकशी केली. यावेळी त्यांनी भगवा झेंडा हातात घेऊन घोषणाही दिली.
राष्ट्रमाता जिजाऊ आदर्शमाता - कोश्यारी
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात राष्ट्रमाता जिजाऊंचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या कार्याची सदैव आठवण येथील जनता आदर्श माता म्हणूनच ठेवेल असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. त्यांनी पाचाड येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर उपस्थितांशी चर्चा केली. महिलांनी प्रशासनामध्ये अधिक संख्येने येण्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर रायगड किल्याच्या पायथ्याशी हेलिपॅड निर्माण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना राज्यपालांनी दिल्या आहेत.
राज्यपाल भरतसिंह कोश्यारी हे दोन दिवस रायगड दौऱ्यावर आले आहेत. रायगड किल्याच्या संवर्धन कामाची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत. 3 फेब्रुवारीला जिल्ह्याची आढावा बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. रायगड किल्ला संवर्धन कामाची पाहणी करण्यापूर्वी राज्यपालांनी पाचाड येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांचे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी तसेच स्थानिक सरपंच संयोगिता गायकवाड यांनी स्वागत केले. यावेळी राज्यपालांनी उपस्थित महिलांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून महिलांनी प्रशासनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याबाबत आपले मत व्यक्त केले.
रायगड किल्याचे महत्व पाहता पायथ्याशी पाचाड येथे हेलिपॅड करण्याच्या सूचना राज्यपालांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच आपल्या पुढील दौऱ्यापूर्वी हेलिपॅड निर्मिती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रशासनाच्या वतीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेची प्रतिमा भेट दिली. याप्रसंगी राज्य मुद्रेवरील असलेली संस्कृतमधील रचना वाचता येते का? अशी विचारणा जिल्हाधिकाऱ्यांना केली असता या राजमुद्रेवरील असणाऱ्या रचना वाचून दाखविल्या.