रायगड - रायगड जिल्ह्यातील मुरुड व रोहा या तालुक्यातील वाघूळवाडी ते तळेखार विभागातील १५ गावांची जमीन संपादित करून तेथे फार्मा पार्क प्रकल्प उभारला जाणार आहे. त्याला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. यासंदर्भात शनिवारी भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांची भेट घेतली. भूमिपुत्र सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जनार्दन भगत, राजेंद्र सुतार, महेश म्हात्रे, भाजपा अनुसूचित जाती सेल रायगडचे जिल्हाध्यक्ष निलेश महाडिक यांचा या प्रतिनिधी मंडळात समावेश होता. अॅड. महेश मोहिते यांनी राज्यपालांना प्रस्तावित फार्मा प्रकल्पाची माहिती दिली.
स्थानिक प्रशासनाकडून राज्यपाल माहिती मागविणार -
स्थानिक शेतकऱ्यांचा या फार्मा प्रकल्पाला जमिनी देण्यास विरोध आहे. आपण या प्रकल्पात लक्ष घालावे आणि स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनती अॅड. महेश मोहिते यांनी केली. त्यांची विनती राज्यपालांनी मान्य केली असून या प्रस्तावित फार्मा प्रकल्पाची माहिती स्थानिक प्रशासनाकडून मागवू घेऊ आणि त्यातून मार्ग काढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे.
'पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना आमचा विरोध कळवा' -
मुरुड रोहा तालुक्यातील शेतकऱ्याचा बल्क फार्मा पार्क प्रकल्पाला विरोध आहे. मात्र, आमच्यावर प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत आमचा विरोध आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रसायन मंत्री सदानंद दौडा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यान कळवावा, अशी मागणी भूमिपुत्र सामाजिक संस्थेने राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे.