रायगड - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे २ दिवसांच्या रायगड दौऱ्यावर आहेत. आज (सोमवार) त्यांनी रायगड जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती घेतली. तसेच त्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना सुचनाही केल्या.
जिल्ह्यातील रखडलेला रोरो प्रकल्प, शिक्षण, आरोग्य, रस्ते, शेतकरी कर्जयोजना, पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान आणि भरपाई, कचरा नियोजन, डम्पिंग ग्राउंड केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा यावेळी कोश्यारी यांनी घेतला. राज्यपालांनी जिल्ह्यात येऊन जिल्ह्याच्या आढाव्याची घेतलेली ही पहिलीच बैठक होती. यावेळी राज्यपालांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचनाही केल्या. तर जिल्हा कौशल्य विकास अंतर्गत केलेल्या कामाचे आणि ओडिएफबाबत कौतुकही केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी दिली.
आज सकाळी १० वाजता जिल्ह्याच्या आढाव्याच्या बैठकीला जिल्हा नियोजन भवनात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सुरू असलेल्या योजनांची माहिती राज्यपाल महोदयांना दिली. अलिबाग मांडव ते भाऊचा धक्का ही रोरो सेवा अद्याप सुरू झाली नसल्याबाबत राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा कौशल्य विकास अंतर्गत अलिबाग आणि तळोजा जेलमध्ये सोलर सिस्टम बल्प दुरुस्तीबाबतचे शिक्षण कैद्यांना दिले आहे. येथील सोलर बल्पची दुरुस्ती कैद्यामार्फत केली जात असल्याने राज्यपालांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. तसेच जिल्हा ओडिएफ अंतर्गत हागणदारी मुक्त झाल्याबाबतही राज्यपालांनी कौतुक केले. आदिवासी, कातकरी यांच्या विकासाच्या योजना त्यांच्यापर्यत पोहोचवण्यासाठी सूचनाही त्यांनी केल्या. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री रस्त्याबाबतही माहिती घेतली. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये रायगड जिल्हा हा देशात दहा मध्ये असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
समग्र शिक्षण अंतर्गत केंद्राकडून येणारा फंड दोन वर्षापासून आलेला नसल्याची बाब पालकमंत्री आदिती तटकरे यांनी राज्यपालांच्या निर्दशनास आणून दिली. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबत लेखी पत्र देण्यास पालकमंत्री आदिती तटकरे यांना सांगितले. तसेच ही बाब केंद्राकडे कळवणार असल्याचे ते म्हणाले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी राज्यपालांना गणेशमूर्ती आणि श्रीवर्धनमधील सुपारीचे रोपटे भेट दिले.