रायगड -गांजा तस्करी गुन्हातील फरार आरोपींना पकडण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. या आरोपींविरोधात उस्मानाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गेल्या दोन वर्षांपासून हे आरोपी पोलीसांना हुलकावणी देत होते. रिंकी चंद्रशेखर कोळेकर (वय-32, रा- यशवंत नगर,खोपोली), शैजाद आजाद राजपूत (वय-27 रा- यशवंत नगर खोपोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दोन वर्षापासून देत होते हुलकावणी
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुबे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी फरारी आरोपींंना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर खोपोली पोलिसांनी सापळा रचत या दोन गुन्हेगारांना अटक केली. चौकशीदरम्यान या दोघांनी गुन्ह्याची कबूली दिली आहे. गेल्या दोन वर्षापासून हे दोघे उस्मानाबाद पोलीसांना हुलकावणी देत होते.
खोपोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी रिंकीवर रायगड तसेच नळदुर्ग पोलीस ठाण्यात याआगोदर गुन्हा दाखल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांच्या कामगिरीमुळे हे फरार आरोपी पकडले गेले असल्यामुळे पोलीस विभागाचे कौतुक होत आहे.