रायगड - सरकारने आधारकार्डमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा जनतेला खुली करून दिली आहे. या सुविधांचा काहीजण गैरवापर करून फसवणूक करण्याचा गुन्हा करत असल्याची बाब समोर आली आहे. मृत जागा मालक व परराज्यात, परदेशात राहणाऱ्या व्यक्तीचा आधारकार्ड व पॅनकार्ड बोगस व्यक्तीच्या नावाने तयार करून खरेदीदारांना जमीन विकणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे पथकाने जेरबंद केले आहे.
स्थानिक गुन्हे पथकाने सात आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड बनविणारी यंत्रसामुग्री व 10 लाख 50 हजाराची रक्कम हस्तगत केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणाने आधारकार्ड सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या फसवणुकीच्या गुन्ह्यात मुख्य सुत्रधारापैकी घनश्याम रमेश उपाध्याय (रा. मानपाडा, डोंबिवली), संदीप जगन लोगले (रा. पाली, कर्जत) या दोन आरोपीसह दलाल व सरकारची महा ई सेवा केंद्रातील दोन आरोपी यांना अटक केली आहे.
रायगड जिल्ह्यात सध्या नवीन नवीन उद्योग प्रकल्प येत असल्याने येथील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे जागा व्यवहारात अपहार होण्याचे प्रकारही वाढले आहेत. रोहा तालुक्यातील सुशील भरतु याची मौजे चांडगाव येथे तर ओमप्रकाश वसिष्ठ यांची मौजे शेडसई येथे प्रत्येकी साडेसहा एकर जागा आहे. सुशील भरतु हे 2010 मध्ये मृत झाले आहेत तर, ओमप्रकाश वसिष्ठ हे दिल्ली येथे राहत असल्याने अनेक वर्षे आलेले नाहीत. भरतु यांचा मयत असल्याचा व ओमप्रकाश वसिष्ठ हे दिल्लीत असल्याचा फायदा आरोपीनी घेऊन त्यांच्या जमिनी परस्पर विकण्याचा प्लॅन केला.
गुन्ह्यातील आरोपींनी सुशील भरतु व ओमप्रकाश वसिष्ठ यांची माहिती घेऊन त्यांच्या जागेचे सातबारा व इतर महसुली उतारे काढून घेतले. त्यानंतर मृत भरतु व दिल्ली येथे राहणारे वसिष्ठ यांच्या नावाने बोगस व्यक्ती तयार केल्या. गुन्ह्यातील आरोपींनी महा ई सेवा केंद्रात जाऊन मूळ मालकाचा मूळ आधार नंबर व बायोमेट्रिक आयडेंटिटी न बदलता त्यावरील नावे, राहण्याचा पत्ता व इतर माहितीमध्ये शासनाने पुरविलेल्या सोयीप्रमाणे बदल केला.
मूळ मालकांची आधारकार्ड व पॅनकार्ड ही कागदपत्रे बोगस व्यक्तीच्या नावाने तयार करून खरेदीदाराबरोबर रितसर व्यवहार केला तर, आरोपींनी मूळ मालकाच्या नावाने बनावट युनायटेड बँक ऑफ इंडिया, वर्सोवा शाखा, मुंबई व आयडीबीआय बँक, रामनगर शाखा डोंबिवली येथें खाती खोलून त्याद्वारे 28 लाखांची रोख रक्कम काढून घेतली.
ही बाब खरेदीदाराच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे विभागाकडे याची तक्रार दाखल केली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे विभागाने तपास करून या टोळीतील बारा पैकी सात आरोपींना अटक केली आहे. त्याच्याकडून एक संगणक, एक लॅपटॉप, एक कलर प्रिंटर तसेच बनावट आधारकार्ड बनविणारी यंत्रसामुग्री व बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड व 10 लाख 50 हजाराची रोकड जप्त केली आहे.
आधारकार्डमध्ये बदल करण्याची सुविधा शासनाने दिली असून याचा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती गैरवापर घेत आहेत. त्यामुळे जमिनीचा व्यवहार करताना मूळ मालक, जमिनीचे कागदपत्रे, सर्च रिपोर्ट पाहूनच व्यवहार करा, असे आवाहन जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले आहे.