रायगड - किल्ले रायगडावर जतन आणि संवर्धनाचे काम किल्ले रायगड प्राधिकरणामार्फत सुरू आहे. किल्ले रायगडावर सुरू असलेल्या उत्खनन कामाच्या वेळी शिवकालीन स्त्रीयांचा अलंकार ठेवा म्हणजे एक सोन्याची बांगडी आणि निरांजन सापडले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात सुस्थितीत सापडलेला स्त्रीयांचा हा पहिला अलंकार आहे. रायगड प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या या उत्खननाचे महत्त्व पुन्हा प्रत्ययास आले आहे.
किल्ले रायगडावर सापडला स्त्रीयांचा अलंकार
किल्ले रायगड प्राधिकरणामार्फत किल्ल्यावर जतन, संवर्धन आणि उत्खनन काम सुरू आहे. या उत्खननात आतापर्यंत अनेक अनमोल खजाना मिळालेला आहे. मात्र आज मिळालेला ऐतिहासिक खजाना हा स्त्रियांच्या बाबतीत असून असा ठेवा पहिल्यांदाच मिळाला आहे. जगदीश्वर मंदिराशेजारी असलेल्या एका वाड्याच्यामध्ये उत्खनन सुरू आहे. या वाड्यात साडे तीनशे वर्षांपूर्वीची एक सोन्याची नक्षीदार बांगडी आणि निरांजन सापडला आहे.
'उत्खननसाठी स्पेशल सेलची परवानगी द्या'
किल्ले रायगडावर 350 ठिकाणी उत्खनन होणे गरजेचे आहे. पुरातत्व विभागाच्या उत्खननाच्या गतीने 350 ठिकाणचे उत्खनन होण्यासाठी काही वर्षे जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी रायगड प्राधिकरणाच्या स्पेशल सेलला उत्खननाची परवानगी द्यावी, अशी मागणी रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी केली आहे.