रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिद्दी जोहरला शह देण्यासाठी बांधलेला पद्मदुर्ग किल्याच्या जागर कार्यक्रम 22 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. कोरोना संकट असल्याने यावेळेला मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पद्मदुर्ग जागर कार्यक्रम साजरा केला जाणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अशिलकुमार ठाकूर यांनी दिली. पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीमार्फत किल्ल्यावर जागर, शिवकालीन खेळ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरतेबाबत पोवाडा असा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो.
पद्मदुर्ग जागर यावर्षी साधेपणाने -
कोरोना प्रादुर्भाव असल्याने पद्मदुर्ग जागर कार्यक्रम यावेळी साधेपणाने साजरा केला जाणार आहे. 100 व्यक्तीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. मुरुड शहरातील राधाकृष्ण मंदीर येथून महाराजांची पालखी बोटी मधून किल्ल्यात जाणार आहे. तिथे पोहचताच कोटेश्वरी मातेचेचे मूळ स्थान असलेल्या ठिकाणी कोटेशवरी मातेची ओटी व पूजन करून पालखी किल्ल्यात प्रवेश करेल. किल्ल्यात पालखीचा प्रवेश होताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिषेक केला जाईल. अभिषेक संपन्न होताच महाराजांची आरती घेण्यात येणार आहे. अशी जागर कार्यक्रमाची रूपरेषा राहणार आहे.
शिवकालीन शस्त्र याचे खेळ आणि माहिती कार्यक्रम होणार -
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अभिषेक कार्यक्रम संपन्न झाल्यावर महाराजांबद्दल त्यांच्या कार्याची व किल्याची माहिती प्रमुख वक्ते अनिकेत अशोक पाटील सांगणार आहेत. शिवरायांच्या काळात जे शौर्याचे खेळ खेळले जायचे ते शौर्य खेळ म्हणजे दांडपट्टा तलवारबाजी, मलखांब व इतर शौर्य खेळाचे प्रात्यक्षिक साजरे होणार आहेत. तदनंतर प्रसादाचे वाटप होऊन पालखी गडावर फिरवली जाणार आहे, अशी माहिती समिती अध्यक्ष अशिल कुमार ठाकूर यांनी दिली आहे. कार्यक्रमास निमंत्रीत आमदार महेंद्र दळवी नगराध्यक्षा स्नेहा पाटील व नगरसेवक व मुख्य पदाधिरी उपस्थित रहाणार आहेत.
पद्मदुर्गाचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा यासाठी जागर -
किल्ले पद्मदुर्ग जागराचे यंदाचे 12 वे वर्ष आहे. पद्मदुर्ग किल्ल्याचा इतिहास हा गेली अनेक वर्षे वंचीत राहिलेला आहे. छत्रपती शिवाजी महराजनी बांधलेला हा किल्ला असून त्याचा इतिहास नवीन पिढीला व स्थानिक नागरिक व पर्यटक यांना कळावा यासाठी पद्मदुर्ग जागर दरवर्षी साजरा केला जात आहे.