मुंबई - भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने पूरग्रस्तांना मदत केली आहे. कोकण किनारपट्टी भागात झालेल्या महापूरानंतर येथील लोकांची मोठी हानी झाली आहे. यातील काही कुटुंब विजेअभावी अंधारात आहेत. त्या पार्श्वभूमीवर अशा अंधारातील कुटुंबांना इरफानने मदत केली आहे. त्यामध्ये जिकोनी फाउंडेशन आणि इरफान खान यांनी एकत्र येऊन येथील काही कुटुंबाना सौर उर्जेचे वाटप केले आहे.
'तत्काळ मदतकार्यात योगदान देण्याची इच्छा होती'
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात महापूरानंतर वीजपुरवठा बंद झाला आहे. यातील कुटुंबांना सौर दिव्यांची मदत केली आहे. राजेवाडी, जुईबुद्रुक, ओवळे, चांदवे खुर्द, अदिस्ते व सुतारकोर्ड या रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील गावांना मदत केली आहे.“कोकणातील पूरग्रस्तांची दुर्दशा पाहून मी अस्वस्थ झालो, आणि मला तत्काळ मदतकार्यात योगदान देण्याची इच्छा होती. जिकोनी फौऊंडेशन त्या ठिकाणी अभिनव कामगिरी करीत होते. त्यामुळे त्यांच्यामार्फत आम्ही रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त गावामध्ये सौर दिव्यांचे वाटप केले.
'मुलांना त्यांचा अभ्यास चालू ठेवता यावा'
या उक्रमाद्वारे शेकडो कुटुंबियांच्या जीवनात प्रकाश येईल याचा आनंद आहे, अशी भावना इरफानने यावेळी व्यक्त केली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे गावे पाण्यात बुडाली होती. त्यानंतर दोन आठवडे या लोकांना वीजपुरवठा आणि प्यायला स्वच्छ पाणी नव्हते. सौरदिवे हे त्यांच्या जीवनात सामान्य स्थिती आणण्यासाठी केलेली छोटीशी मदत आहे. सौरदिवे गावांमध्ये पोचविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना केवळ वीजेची मदत झाली असे नव्हे, तर यामुळे मुलांना त्यांचा अभ्यास चालू ठेवता यावा यासाठी जिकोनी फौऊंडेशनतर्फे औषधे, कपडे, गाद्या, गॅस स्टोव्ह व इतर जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचे मदतकार्य केले जात आहे.