रायगड - काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी अलिबाग विधानसभा मतदारसंघात स्वत:चे पुत्र व काँग्रेसमधून बंडखोरी केलेले उमेदवार राजेंद्र ठाकूर यांना पाठिंबा असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
मधुकर ठाकूर यांनी अलिबाग येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी, विधानसभा निवडणुकीसाठी माझ्या कुटुंबातून तीन जणांनी उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु, उमेदवारीसाठी अंतिम नाव निश्चित करताना पक्ष नेतृत्त्वाने विश्वासात न घेतल्याने नाराज असल्याते मधुकर ठाकूर यांनी सांगितले.
हेही वाचा कणकवलीत राणेंना भिडणारे काँग्रेसचे राणे आहेत तरी कोण?
मोठ्या मुलाने निवडणुकीतून माघार घेतल्याने उरलेल्या दोन अर्जांपैकी राजेंद्र याने निवडणूक लढवावी असा निर्णय मी घेतला होता. परंतु, मला काहीही विचारणा न करता अलिबाग विधानसभेसाठी काँग्रेसने अॅड.श्रध्दा ठाकूर यांना उमेदवारी जाहीर केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही नाराजी असल्याचे ठाकूर म्हणाले. तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच अपक्ष निवडणूक लढण्याचे ठरवले आहे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा जळगाव जिल्ह्यात बंडखोरीमुळे बदलणार राजकीय समीकरणे
पक्ष आता आमच्यावर कारवाई करण्याच्या गोष्टी करत आहे. परंतु, गेली 27 वर्षे मी पक्ष सांभाळला; वाढवला आहे, असे ते म्हणाले. तसेच अलिबाग मुरूडमध्ये विरोधक बलाढय असताना पक्ष टिकवला असून, त्यासाठी पक्ष आम्हाला हे बक्षिस देत असल्यास हे देखील कबूल करत असल्याचे ठाकूर यांनी म्हटले. राजेंद्र ठाकूर आमचे अपक्ष उमेदवार असून, त्यांना निवडून आणण्यासाठी मी माझी पूर्ण ताकद लावणार आहे, असे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी यावेळी जाहीर केले.