रायगड - लॉकडाऊनच्या काळात शासनाने अधिकृत मासेमारीसाठी परवानगी दिली असली तरी बेकायदा मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्र, बेकायदा मासेमारी करणारे गैरफायदा घेताना दिसत आहेत, अशा बेकायदा एलईडी मार्फत मासेमारी करणाऱ्या अलिबागमधील मच्छीमारांना रायगडच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने चांगलाच दणका दिला. बंदी असलेल्या एलईडी दिव्यांचा वापर करत मासेमारी करणाऱ्या 2 बोटींवर कारवाई करण्यात आली असून एलईडी मासेमारीसाठी वापरण्यात आलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
बेकायदा एलईडीमार्फत मासेमारी करणाऱ्या दोन बोटींवर मत्स्य विभागाची कारवाई ज्ञानेश्वरी माऊली व भक्त मल्हार अशा २ बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यावरील 6 एल ईडी बल्ब, 2 सब मर्सिबल पंप, 1 जनरेटर, 1 एलईडी फोकस असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अलिबागच्या समुद्रात ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती रायगडचे सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त सुरेश भारती यांनी दिली. शासनाने एलईडी, बुल फिशिंग, पर्सिनेट मासेमारी करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. असे असूनही या पद्धतीची बेकायदा मासेमारी अजूनही सर्रास सुरू आहे. त्यामुळे अनेक वेळा पारंपरिक आणि बेकायदा मासेमारी करणाऱ्या मच्छीमारामध्ये संघर्ष होत असतो. भर समुद्रातही संघर्ष झाल्याच्या घटना ताज्या आहेत. पारंपरिक मच्छीमारांनी बेकायदा मच्छीमार करणार्याविरोधात आवाज उठविल्याने यावर शासनाने बंदी घातली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात मासेमारी करण्यास बंदी केली होती मात्र ही बंदी आता अटीच्या अधीन शिथिल केली आहे. बंदी उठल्याने मच्छीमार हे मासेमारी करण्यास जाऊ लागले आहेत. काही बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्या आहेत याचाच फायदा घेत एलईडी मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीसाठी उतरल्या आहेत. यातील दोन बोटी मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती नौकांनी हेरल्या. त्यांची तपासणी केली असता बोटींवर एलईडी मच्छीमारीसाठीचे साहित्य आढळून आले. या बोटी व त्यावरील साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. रायगडच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडे केवळ एकच गस्ती नौका असून कर्मचारी संख्यादेखील खूपच कमी आहे. या नौका आणि कर्मचारी संख्या वाढवल्यास बेकायदा मासेमारीला आळा बसू शकेल.शासनाने नियम व अटींच्या अधीन राहून लॉकडाऊनच्या काळात मासेमारीला परवानगी दिली आहे. या बोटींवर नियमांचे पालन होते की नाही यावर आमचे लक्ष असल्याचेही माहिती सुरेश भारती यांनी दिली.