रायगड - पनवेलमध्ये एका डॉक्टर पत्नीने आपल्या बोगस डॉक्टर पतीचे पितळ उघडे पाडले आहे. महेंद्र पाटील असे या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याच्याविरोधात पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपी महेंद्र हा पेणमधील गडब गावातील रहिवासी आहे. तो डॉक्टरांच्या विविध परिषदांमध्ये सुद्धा सहभागी झाला होता. अनेक सामाजिक संस्थांचा पदाधिकारी देखील आहे. पुण्यातील भारती विद्यापीठातून एमबीबीएस आणि बीजे मेडीकल कॉलेजमधून एमडी मेडिसीन पूर्ण केले असल्याचे त्याने लग्नापूर्वी पत्नीला सांगितले होते. महेंद्र पाटील हा पेण येथील अनेक रुग्णालयात प्रशिक्षण घेत होता. तसेच बोगस डॉक्टर महेंद्र हा पेण येथील बडय़ा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवेसाठी काम करत होता. त्यामुळे संबंधित तरुणी व तिच्या घरच्यांचा तो डॉक्टरच असल्यावर विश्वास पटला. त्यानंतर २००७ साली त्यांचा विवाह देखील झाला. या डॉक्टर जोडप्याला सात वर्षांचे अपत्य देखील आहे. बोगस डॉक्टर महेंद्र पाटील याने अनेक रुग्णांवर पेण येथील खासगी विविध रुग्णालयांमधून उपचार केले आहेत, तर काहीवेळा पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा उपचार करत असे.
कालांतराने बोगस डॉक्टर महेंद्र पाटील विरुद्ध अनेक तक्रारी येत असल्याने त्याच्या पत्नीला संशय येऊ लागला. त्यावेळी आपले वैद्यकीय शिक्षण कुठे झाले? याबद्दल विचारले असता नेहमी वेळ मारून नेण्याची उत्तरे पतीकडून मिळत होती. त्यामुळे पत्नीचा संशय आणखी बळावला. त्यानंतर तिने आपल्या पतीचे डॉक्टरकीचे प्रमाणपत्र क्रमांक तपासला असता तो दुसऱ्या डॉक्टरच्या नावे होता. पतीचे बिंग फुटल्यावरही त्याला संधी दिली. पत्नीने वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कोणतेच कामकाज करण्यास त्याला मनाई केली होती. मात्र, त्याने छुप्या मार्गाने बोगस वैद्यकीय सेवेचे चालुच ठेवले होते. यानंतर देखील तिने अनेकाद त्याला संधी दिली. मात्र, त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे तिने त्याचे पितळ उघडे पाडायचे ठरवले आणि थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पनवेल पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी त्या बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे.