रायगड - रोहा नगरीचे आराध्यदैवत श्री धावीर महाराज पालखी सोहळ्याला आज सुरुवात झाली. पोलीस दलाकडून पहाटे श्री धावीर महाराज यांना सलामी देऊन मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. श्री धावीर महाराज यांची पालखी शहरात फिरून दुसऱ्या दिवशी पालखीचे प्रस्थान देवळात होते. श्री धावीर महाराज यांचा पालखी सोहळा हा रोहेकर व रायगडवासियासाठी एक पर्वणी असते. पालखी सोहळ्याला चाकरमानी तसेच मुंबई ठाण्यातून भक्त आवर्जून उपस्थिती लावतात.
श्री धावीर महाराज हे रोहा शहरासह तालुक्याचे आराध्य दैवत आहे. नवरात्रीमध्ये श्री धावीर महाराज घटी बसल्यानंतर धावीर महाराजांच्या उत्सवाला सुरुवात होते. दसरा झाल्यानंतर दुसरा दिवस हा श्री धावीर महाराज यांचा पालखी सोहळा संपन्न होतो. हा पालखी सोहळा दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो.
सकाळी सहा वाजता श्री धावीर महाराज यांची पालखी देवळातून बाहेर काढण्यात आली. पोलीस दलाकडून श्री धावीर महाराज यांना सलामी देण्यात आली. अनेक वर्षांपासून ही परंपरा श्री धावीर महाराज पालखी सोहळ्यात सुरू आहे. धावीर महाराजांची पालखी ही शहरात फिरून रोहेकर महाराजांचे दर्शन घेतात. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोरे आळी येथे धावीर महाराजांचे वारे खेळले जाते. यावेळी हजारो भाविक हा सोहळा पाहण्यास गर्दी करीत असतात. पालखी सोबत ढोल ताशे, खालुबाजा हे पारंपरिक वाद्य वाजविले जातात. श्री धावीर महाराज घरी येणार असल्याने नागरिक दारासमोर रांगोळ्या काढून सजावट करतात. त्यामुळे श्री धावीर महाराज यांचा हा पालखी सोहळा म्हणजे रोहेकरासाठी एक पर्वणीच असते. पालखी सोहळ्यानिमित्त पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.