रायगड - जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक भागात पाणी घुसले होते. अलिबाग नगर परिषदेच्या उर्दू शाळेमध्येही पाणी शिरल्याने या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच घरी सोडण्यात आले होते. मात्र, दरवर्षी या उर्दू शाळेमध्ये पावसाळ्यात पाणी शिरत असल्याने अलिबाग नगरपरिषद प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अशी पालकांची प्रतिक्रिया आहे.
अलिबाग नगरपरिषदेची आंग्रे समाधी जवळील परिसरात उर्दू शाळेची बैठी इमारत आहे. पहिली ते आठवी व बालवाडीचे वर्ग या बैठ्या इमारतीमध्ये भरत असतात. पहिली ते आठवी वर्गात 138 तर बालवाडीमध्ये 40 असे 178 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. पावसाळा सुरू झाला की मुसळधार पावसाने पटांगणात साचलेले पाणी इमारतीच्या व्हरांड्यात साचते. त्यामुळे शाळेत पूरपरिस्थिती निर्माण होते.
मंगळवारी जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने सुरुवात झाली. त्यामुळे उर्दू शाळेच्या बैठ्या इमारतीमध्ये पाणी शिरले. शाळेत शिरलेल्या पाण्यातच मुले बागडताना दिसत होती. बालवाडी वर्गात पाणी घुसल्याने या वर्गातील पालकांना बोलावून विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले. दरवर्षी उर्दू शाळेत पावसाळ्यातील ही परिस्थिती असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
शाळा प्रशासनाने व पालकांनी नगरपरिषद प्रशासनाला शाळेत पाणी शिरल्याचे सांगूनही कोणीही कर्मचारी आला नसल्याचे उपस्थितांचे म्हणणे आहे. शाळेला नवी इमारत बांधून देण्याबाबत प्रस्ताव दाखल केलेला आहे. मात्र, अद्यापही त्याला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत शिरलेल्या अस्वच्छ पाण्यात शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे उर्दू शाळेची इमारत लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
उर्दू शाळेच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव सर्व शिक्षा अभियानकडे पाठविला आहे. याबाबत आमचा पाठपुरावा सुरू असून विधानसभेपूर्वी मंजुरी मिळेल. अशी प्रतिक्रिया अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी दिली.
पावसाळ्यात नेहमी शाळेत 'पूरमय' परिस्थिती असते. तर, शाळेच्या इमारतीला पत्रे असल्याने उन्हाळ्यात घामाच्या धारा निघत असतात. पावसाळ्यात पाणी शिरत असल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांना याचा त्रास सहन करावा लागतो. शाळेच्या या समस्येकडे वारंवार लक्ष वेधले जाते. मात्र, प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी प्रतिक्रिया शाळा समिती अध्यक्ष नासीर हकीम यांनी दिली.