रायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर शिवजयंतीच्या पूर्व संध्येला मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या एका टोळक्याला शिवभक्तांनी बेदम चोप दिला. 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. धिंगाणा घालणाऱ्या या तरुणांविरोधात महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणांना चोप देतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत.
किल्ले रायगडावर शिवजयंतीनिमित्त हजारो शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यास येतात. मात्र, काही जण हे गड-किल्याचे पावित्र्य मलिन करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रकार 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडला. किल्ले रायगडावरचा एक व्हिडिओ समोर आला. व्हिडिओमध्ये पिवळ्या रंगाचे कुर्ते घातलेले तरूण गुरूवारी किल्ले रायगडावर आले होते. त्यांनी मद्य प्राशन केले होते, असे शिवभक्तांचे म्हणणे आहे. संध्याकाळी गडावरील बाजारपेठ परिसरात या तरूणांना दुसर्या गृपमधील तरूण-तरूणी बेदम मारहाण करताना दिसत आहेत. झेंड्यासाठी वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या दांड्यांनी या तरुणांना मारहाण झाली आहे.
गड किल्ल्याचे पावित्र्य राखणे गरजेचे -
इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे मांगल्य आणि पावित्र्य राखले गेले पाहिजे. तिथे कोणी दारू पिऊन धिंगाणा घालत असतील तर निंदनीय आहे. त्याचे समर्थन होऊ शकत नाही. मात्र, कायदा हातात घेऊन त्यांना मारहाण करने कितपत योग्य आहे, अशी चर्चाही आता पून्हा जोर धरू लागली आहे.