नवी मुंबई - पनवेल येथील बालरोगतज्ज्ञ परदेशातून आलेल्या मुलीच्या संपर्कात येऊनही स्वतःला होम क्वारंटाईन न करता बाल चिकित्सालयात रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पनवेल परिसरात खळबळ माजली आहे. पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून त्यांचे रुग्णालय सील करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या घरात कोणीही व्यक्ती परदेशातून आली असेल, तर त्या व्यक्तीच्या घरातील सदस्यांना 14 दिवस होम क्वारंनटाईन ( अलगिकरण) राहावे लागते. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्ती परदेशातून आली असल्यास त्याची माहितीही महानगरपालिकेला देणे आवश्यक असते. मात्र, हीच माहिती पनवेलमधील बाल चिकित्सालय चालविणाऱ्या डॉक्टरने महापालिका प्रशासनापासून लपविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पनवेलमध्ये बालचिकित्सालय चालविणारे डॉ. महेश मोहिते यांची मुलगी स्वरा मोहिते 16 मार्चला अमेरिकेमधून आली होती. डॉ. मोहिते व स्वरा मोहिते एकाच घरात राहत असून डॉ. मोहिते हे तिच्या वारंवार संपर्कात येत होते. मात्र, ही माहिती महापालिकेला न देता डॉ. मोहिते हे रुग्णालयात येऊन रुग्णांना वैद्यकीय सेवा देत होते. डॉक्टर असूनही अशा प्रकारचा हलगर्जीपणा केल्यामुळे मोहिते यांचे रुग्णालय सील करण्यात आले आहे. रुग्णालयाचा परवानाही 1 वर्षासाठी रद्द करण्यात आला असल्याची माहिती पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.