रायगड - पंजाब नॅशनल बँकेत १३,५७८ कोटींचा घोटाळा करून फरार झालेल्या नीरव मोदी याचा किहीम येथील रुपाणी बंगला ६ मार्चला जमीनदोस्त करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली असून काही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बंगल्याच्या चारी बाजूच्या पिलरला सुरुंग लावून हा बंगला जमीनदोस्त करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
निरव मोदीच्या बंगल्यावर याआधी १७ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यास सुरुवात केली होती. यासाठी जेसीबीच्या साहाय्याने बंगला पाडण्याचे काम सुरू केले होते. मात्र, हा बंगला आरसीसी व दगडाने मजबूत बांधकाम करून बांधला असल्याने तो पाडण्यास अडचणी येत होत्या. यासाठी मोदी यांचा हा बंगला सुरुंग लावून पाडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
बाबासाहेब अभियांत्रिकी कॉलेजचे स्थापत्य अभियांत्रिकी यांनी या बंगल्याची तपासणी करून हा बंगला सुरुंग लावून उडविण्याचा अभिप्राय दिला होता. त्यानुसार ६ मार्च रोजी मोदी यांचा बंगला सुरुंग लावून जमीनदोस्त करण्यात येणार आहे. यासाठी आज ५ मार्च रोजी उपजिल्हाधिकारी भरत शितोळे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम विभाग मधुकर चव्हाण, महसूल, बांधकाम, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
बंगल्याच्या चारी बाजूला पोकलनच्या मदतीने बीळ मारून व बंगल्याचे पिलर सुट्टे केले जाणार आहे. त्यानंतर त्यात सुरुंग लावण्यात येणार आहे. यासाठी सुरुंग लावणारे तज्ञ पथक याठिकाणी दाखल होणार आहे. त्यानंतर उद्या साधारण पाच वाजेपर्यंत हा बंगला जमीनदोस्त होणार असल्याचे शितोळे यांनी सांगितले. यासाठी आज रात्री जिल्हा प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.