रायगड - 29 एप्रिल रोजी महाड येथील आदित्य वृद्धाश्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विभाग संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक खालापूर पोलीस ठाणे अनिल विभुते आणि कर्मचाऱ्यांनी भेट देऊन तेथील वृद्धांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना असणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेतली असून पोलीस ठाण्याकडून अन्नधान्य, मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. कोरोना आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करीत दक्षता घेण्याबाबत सांगितले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक खालापूर पोलीस ठाणे अनिल विभुते, महिला पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे, गायत्री जाधव, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत-देसाई, पोलीस नाईक नितीन शेंडगे, पोलीस कॉन्स्टेबल समीर पवार, विठ्ठल घावस, जगदीश वाघ आदी उपस्थित होते.
पोलिसांच्या कामगिरीने वृध्द मंडळी भारावली
तर या अन्नधान्य, मास्क, सॅनिटायझर वाटपाने वृध्दाश्रमातील सर्व बांधवाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला असून सर्व वृध्दांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आशीर्वाद देत पोलीस म्हणून कर्तव्य बजावत असताना स्वतः बरोबर कुटुंबाची काळजी घ्या असा कानमंत्र दिला.