रायगड - महाड तालुक्यातील इसाने कांबळे गावाजवळ सावित्री नदीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या डोक्यावर गंभीर स्वरुपाची जखम असल्याचे निदर्शनास आले. या व्यक्तीच्या डोक्यावर एका अज्ञाताने कुठल्या तरी हत्याराने वार करून त्याला ठार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अजून पटलेली नाही.
हेही वाचा - रायगड : पर्यटनावर होणाऱ्या खर्चातील 5 टक्के निधी सुविधांसाठी राखून ठेवणार
सावित्री नदीच्या पात्रात एका इसमाचा मृतदेह पडला असल्याची माहिती महाड एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस सहाय्यक निरीक्षक पंकज गिरी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून त्यास शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
हत्येचा संशय, पोलीस तपास सुरू
सावित्री नदीच्या पुलावर रक्ताचे डाग असल्याचे दिसून आले. मृत व्यक्तीच्या अंगावर कपडे नसल्याने कोणत्याही स्वरुपाची ओळख पटली नाही. मात्र, या व्यक्तीच्या डोक्यावरील गंभीर दुखापतीमुळे तिला कोणी तरी मारून नदीच्या पात्रात टाकले असावे, असा अंदाज वर्तवला जात आहे. नदीपात्रात लोखडी तलवार सापडली असून महाड पोलीस अधिक तपास करीत आहे.
हेही वाचा - अर्णबसह दोघांना 10 मार्चच्या सुनावणीला रहावे लागणार हजर, अन्यथा कायदेशीर कारवाई