रायगड - यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरीही कमी वेळात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील 25 धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच उर्वरित तीन धरणे 75 टक्के भरली असून, आतापर्यंत एकूण 68 टक्के पाणी धरणांत साठले आहे. यामुळे रायगडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पावसाने जिल्ह्यात दमदार सुरुवात केल्याने 2 ऑगस्टपर्यंत 41774.21मिमी पाऊस पडला असून, सरासरी 2610.89 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात फणसाड (मुरुड), वावा (तळा), सुतारवाडी (रोहा), आंबेघर (पेण), श्रीगाव (अलिबाग) यांसह २० धरणे शंभर टक्के भरली आहेत. तसेच रानवली, कार्ले (श्रीवर्धन) व पुनाडे (उरण) ही तीन धरणे 75 टक्के भरली आहेत.
2 ऑगस्ट पर्यंत 28 धरणांत 68 द.ल.घन मीटर पाणीसाठा आहे. त्यामुळे रायगडसह नवी मुंबईतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यावेळी पावसाला उशीरा सुरूवात झाली. अखेर जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे रायगडकर सुखावले आहेत.