रायगड - गोकुळाष्टमी उत्सव हा राज्यासह रायगडात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आज (शनिवारी) जिल्ह्यात २ हजार १२२ सार्वजनिक तर ६ हजार २९८ खासगी अशा एकूण ८ हजार ४२० दहीहंड्या उभारण्यात आल्या आहेत. तर जिल्ह्यातून १६६ गोविंदाच्या मिरवणुका निघणार असून २४ दहीहंड्या या लाखाच्या बक्षिसाच्या लावण्यात येणार आहेत. दहीहंडी उत्सवासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आला आहे.
कृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर दुसरा दिवस हा दहीहंडी फोडण्याचा असतो. गोविंदाचा दिवस असल्याने लहानापासून मोठे गोविंदा फळीने शहरात, गावात उंचावर लावलेल्या दहीहंडी फोडण्यासाठी जातात. थरावर थर लावून गोविंदा दहीहंडी फोडत असतात. जिल्ह्यातील अनेक भागात पारंपरिक खालू बाजा वाद्यावर गोविंदा पथक ताल धरुन नाचतात.
जिल्ह्यात यावेळी २४ दहीहंड्या लाखाच्या बक्षिसाच्या आहेत. अलिबाग शहरात यावेळी शेकाप व भाजप यांच्या लाखाच्या दहीहंड्या आहेत. सामाजिक बांधिलकीतून कोल्हापूर, सांगली पूरग्रस्त भागासाठी १ लाखाची मदत मंडळाकडून देण्यात येणार आहेत. गोविंदा पथकांना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट, जॅकेट सुविधा मंडळाकडून उपलब्ध करण्यात आली आहे. तर दहीहंडीवरुन कोणी पडल्यास गोविंदाचे विमा कवच मंडळाकडून काढण्यात आले आहे.
अलिबागमध्ये प्रशांत नाईक मंडळ व भारतीय जनता पार्टीच्यावतीने दहीहंड्याचे आयोजन केले आहे. प्रशांत नाईक मंडळाच्या दहीहंडी साठी १८ पथकांनी नावे नोंदवली असून यात ५ मंडळे महिलांची आहेत. यात मुंबईतील वडाळा भागातील एक पथक दहीहंडी फोडण्यास येणार आहे.जिल्ह्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पोलिसांनीही कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दहीहंडीमुळे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.