रायगड- महाड शहराला पुराच्या पाण्याने वेढले असून नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल झालेले आहेत. तर दुसरीकडे सावित्री नदीत असलेल्या मगरीपैकी एक मगर ही पुराच्या पाण्यात शहरातील एका घराच्या छपरावर विसावली आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने दादली पुलावरही मगर दिसली होती. त्यामुळे नागरी वस्तीत मगरींचा वावर वाढल्याने महाडकरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महाड शहरात पाच दिवसापासून मुसळधार पाऊस, पूर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पूर परिस्थिती नियंत्रणात येत असताना पुन्हा सावित्री नदीच्या पातळीत वाढ होत असल्याने पूरपरिस्थिती कायम राहत आहे. पुराच्या पाण्याचा फटका हा नागरिकांना बसत असताना सावित्री नदीत असणाऱ्या मगरीही आता बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे.
महाड शहरात चार दिवस झालेल्या पूरस्थितीने शहरातील सुकट गल्लीत पाणीच पाणी साचले होते. या पुराच्या पाण्यात एक मगर एका घराच्या छपरावर येऊन विसावली होती. याबाबतचा व्हिडिओ एकाने काढला आहे. त्यामुळे ही बाब समोर आली आहे. आठवड्यापूर्वीही दादली पुलावर पुराच्या पाण्यात रात्रीच्या सुमारास मगर विहार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
पुराच्या पाण्यातून मगरी शहरात नागरी वस्तीत आपला जीव वाचविण्याच्या उद्देशाने येत असल्या तरी मगर हिंस्त्र प्राणी असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामळे महाडकरांच्या मनात मगरीच्या भीतीचे सावट पसरले आहे.