रायगड - जिल्ह्यात आज जिल्हा परिषद आणि अलिबाग तहसील कार्यालयात कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे शासकीय कार्यालयात कोरोनाने शिरकाव केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही दोन्ही कार्यालये लवकरच प्रतिबंधित करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील एक कर्मचारी कल्याण येथे नातेवाइकांच्या लग्नसोहळ्यासाठी गेला होता. त्यानंतर तो पुन्हा कामावर रुजू झाला होता. हा कर्मचारी कल्याणहून परत आल्याने कोरोना तपासणीसाठी त्यांचे नमुने आरोग्य विभागाकडून घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने सामान्य प्रशासन विभागात खळबळ उडाली आहे. या बाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
अलिबाग तहसील कार्यालयात काम करणारा कर्मचारी राहात असलेल्या सोसायटीत एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्याच्या संपर्कात हा कर्मचारी आल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. आज त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, महसूल किंवा इतर शासकीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. आता जिल्हा परिषद सामान्य प्रशासन आणि अलिबाग तहसील कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शासकीय कार्यालयातील कर्मचारी भयभीत झाले आहेत.