रायगड - बालवाडी, नर्सरी, केजी, पहिली ते पाचवी या वर्गात तसेच इतर क्लासमध्ये प्रवेश देणे सुरू आहे, अशा जाहिराती किंवा बॅनर आपण कुठे ना कुठे पाहत असतो. पण चक्क एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश सुरू असल्याचे बॅनर तुम्ही पाहिला आहे का? नाही ना. पण अलिबाग शहराच्या वेशीवर 'भाजपात प्रवेश देणे आहे', असे बॅनर झळकले आहे. त्यामुळे अलिबागसह जिल्ह्यात याबाबत चर्चा रंगणार हे मात्र नक्की. भाजप प्रवेशाचे हे बॅनर कोणी लावले हे अज्ञापही गुलदस्त्यात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते दररोज कोणी ना कोणी तरी भाजप व शिवसेनेत प्रवेश करीत असल्याच्या घटना राज्यात घडत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप विरोधात लढण्यासाठी कोणी विरोधक राहणार आहेत की, नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अलिबाग शहरातील एचपी पेट्रोलपंपाशेजारील बायपास रस्त्याच्या बाजूला आज (३० जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास कोणी अज्ञातांनी 'भाजपा प्रवेश देणे आहे', अशा आशयाचा बॅनर दर्शनी भागावर लावला आहे. या बॅनरमध्ये नियम व अटी तसेच टीपही दिली आहे.
प्रवेशासाठी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री नंबरही देण्यात आला आहे. हा बॅनर मध्यरात्री लावण्यात आला असून यामुळे जिल्ह्यात याबाबत चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे. मात्र, हा बॅनर लावून एकप्रकारे भाजपची खिल्ली उडविण्याचा उद्देश असल्याचे दिसून येत आहे. तर अशा एखाद्या पक्षात प्रवेशाबाबतचे बॅनर पहिल्यांदाच लागले आहेत.
हे आहेत नियम व अटी
१) ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य
२) भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती
३) सहकार क्षेत्र बुडविल्याचा अनुभव हवा
ही आहे टीप
१) विचारधारेची कुठली अट नाही
२) आमच्या कडील जागा फुल झाल्यास मित्रपक्षात अॅडजस्ट करता येईल