रायगड - जिल्ह्यातील कर्नाळा सहकारी बँक सध्या डबघाईला आली आहे. मागील आठ महिन्यांपासून ठेवीदारांना त्यांचे पैसे देण्यात आलेले नाहीत. कर्नाळा बँकेचे संचालक आणि माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांच्या कष्टाच्या पैशांवर बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विवेक पाटील यांनी डल्ला मारला असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला. त्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात मोर्चाही काढण्यात आला होता.
बँकेच्या अध्यक्षांनी लोकांच्या पैशावर डल्ला मारल्याचा आरोप ठेवीदारांनी केला व भाजप नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला. ठेवीदारांचे पैसे परत मिळावे, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या विवेक पाटील यांना अटक करून त्यांची संपत्ती जप्त करावी, यासाठी पनवेलमधील कर्नाळा बँकेच्या शाखेवर हजारो ठेवीदारांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात भाजपा नेते किरीट सोमैया, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी सहभागी झाले होते. विवेक पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या नावाने 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढून ती हडप केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
हेही वाचा - विजय मल्ल्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
महाराष्ट्र शासन आणि सहकार विभाग कर्नाळा बँकेचा घोटाळा करणाऱ्या विवेक पाटील यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाळा बँकेचे संचालकांसह आणखी 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील 63 जणांच्या खात्यांवरून बेहिशेबी आणि बोगस कागदपत्र सादर करून 515 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्ज काढण्यात आली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.