रायगड - विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यात 7 विधानसभा मतदार संघातील मतदानासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी झाली आहे. प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.
हेही वाचा - 500 फूट दरीत कोसळूनही ट्रेकर जीवंत !
रायगड जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. 31 ऑगस्ट 2019 पर्यंत पुरुष 11 लाख 52 हजार 911, महिला 11 लाख 12 हजार 563 असे एकूण 22 लाख 65 हजार 478 मतदार नोंदणी झालेली आहे. 2014 च्या तुलनेत महिलांचे प्रमाण पुरुषांमागे 954 होते तर यावेळी यामध्ये वाढ झाली असून 965 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे. 16 हजार 901 दिव्यांग मतदार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघात एकूण 2 हजार 714 मतदान केंद आहेत. सर्व मतदान केंद्रावर मतदारांसाठी तसेच दिव्यांग मतदारांसाठी योग्य त्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात 48 स्कॉड पथक नेमण्यात आलेली आहेत. तसेच पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे. आचारसंहिता लागल्यानंतर जिल्ह्यात लागलेले राजकीय पक्षाचे लागलेले 2 हजार 470 होर्डिंग, बॅनर काढून टाकले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - निवडणूक निकालानंतर आम्हीच फटाके फोडणार - जयंत पाटील
विधानसभा निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी 13 हजार 900 इतका कर्मचारी वृंद नेमण्यात आलेला आहे. 2 हजार 664 पोलीस कर्मचारी, होमगार्ड, राज्य पोलीस व सीआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. तर निवडणूक काळात पैशाची देवाण-घेवाण वाढत असल्याने जिल्ह्यातील 7 मुख्य ठिकाणी चेंकिंग पॉईंट तयार करण्यात येणार असून सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. जिल्ह्यात निवडणुकीच्या अनुषंगाने 530 जणांवर कलम 107 प्रमाणे तर 188 जणांवर कलम 110 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.