रायगड - जिल्ह्यातील माथेरान नगरपरिषदेतील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी केलेल्या भाजप प्रवेशाबाबत शिवसेना सचिव अनिल देसाई आणि गटनेते प्रसाद सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदविला आहे. यानंतर भाजपात प्रवेश केलेल्या त्या दहा नगरसेवकांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अनर्हतेची नोटीस बजावली आहे. याबाबत 30 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे माथेरानच्या भाजपवासी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे.
27 मे रोजी केला होता प्रवेश -
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेत गटनेते प्रसाद सावंत आणि नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली. 27 मेला कोल्हापूर येथे त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे माथेरान नगरपरिषदेत राजकीय बॉम्ब फुटला. शिवसेनेची सत्ता ही माथेरानमध्ये अल्पमतात आली आहे.
हेही वाचा - अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रताप सरनाईकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
शिवसेनेने घेतला आक्षेप -
शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी केलेल्या पक्षांतराबाबत शिवसेनेचे सचिव अनिल देसाई आणि गटनेते प्रसाद सावंत यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे आक्षेप नोंदविला आहे. भाजपात प्रवेश घेतलेल्या दहाही नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांनी अनर्हतेची नोटीस बजावली आहे. या नोटीसीवर 30 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. यामध्ये नगरसेवकांना स्वतः उपस्थित राहण्यास कळविण्यात आले आहे. शिवसेनेने घेतलेल्या या आक्षेपामुळे त्या दहा भाजपवासी नगरसेवकांवर मात्र टांगती तालावर लटकलेली आहे.
भाजपवासी नगरसेवक -
रुपाली आखाडे, प्रियंका कदम, ज्योती सोनावळे, प्रतिभा घावरे, संदीप कदम, सुषमा जाधव, आकाश चौधरी, राकेश चौधरी, सोनम दाभेकर, चंद्रकात जाधव या दहा जणांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला आहे.
हेही वाचा - लेटरबॉम्बने महाराष्ट्र ढवळून काढणारे प्रताप सरनाईक यांचा प्रवास, रिक्षाचालक ते तीनवेळा आमदार