रायगड - निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासन यशस्वी झाले आहे. झालेल्या नुकसानीचे फोटो द्या, म्हणजे मदत करायला सोपे जाईल. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी साधारण ८ दिवस लागण्याची शक्यता आहे. पॅकेज हा शब्द माझ्याकडे नाही. मी थेट मदत देत आहो, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. नुकसानग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
निसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामध्ये घरे, फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तेथील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
फक्त एकच वादळ नाही. यानंतर देखील असे वादळ येत राहतील. त्याअनुषंगाने आपल्याला तयार राहावे लागेल. यावेळी जीवितहानी टळली. मात्र, नुकसान झाले आहे. यानंतर मी फक्त मदतच करणार नाही, तर वादळामुळे नुकसान झालेले घरे कसे बांधता येतील, जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही याचाही विचार करणार आहे. तसेच घरे उद्ध्वस्त झालेल्या लोकांची जेवणाची, राहण्याची सोय प्रशासन करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.