रायगड - 3 जून 2020 हा दिवस रायगडकर नक्कीच विसरणार नाहीत. दीडशे वर्षानंतर रायगडला उद्ध्वस्त करणारे निसर्ग चक्रीवादळ हे 3 जूनच्या सकाळपासून समुद्रकिनारी घोंगावू लागले आणि काही तासातच रायगडला नेस्तनाबूत करून निघून गेले. निसर्ग चक्रीवादळात नागरिकांच्या घरांचे, बागायती, शेतीचे, शाळा याचे अतोनात नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळात 6 जणांचा बळी गेला. आजही रायगडातील नागरिकाच्या निसर्ग चक्रीवादळ बाबत आठवण ताज्या आहेत. तौक्ते चक्रीवादळ 17 मे रोजी आले असून यातही रायगडकरांचे नुकसान झाले आहे. निसर्ग आणि तौक्ते वादळाने हिरावून नेले यावेळी शासनाने मदतिचा हात दिला. मात्र, आजही निसर्ग आणि तौक्ते वादळात सर्वस्व हरवलेले रायगडकर पुन्हा जिद्दीने सावरू लागले आहेत. निसर्ग चक्रीवादळाला आज एक वर्ष पूर्ण झाले याबाबत घेतलेला इटीव्ही भारतचा आढावा.
निसर्गाने हिरावली रायगडकरांची संपत्ती -
3 जून 2020ला सकाळीच निसर्ग वादळ जिल्ह्याच्या किनाऱ्यावर धडकले. 110 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्याने किनारपट्टी गावांना उद्ध्वस्त केले. या वादळाने सहा जणांचा बळी गेला. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. जिल्ह्यात 2 लाख 7 हजार घराची पडझड झाली. 2 हजार 400 कुटुंब कायमची बेघर झाली. 11 हजार 480 हेक्टरवरील नारळ पोफळीच्या बागायती उद्ध्वस्त झाल्या. 1 हजार 976 गावाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. सगळीकडे हाहाकार माजला होता. आठ ते दहा तास चाललेले हे निसर्ग वादळ रायगडकरच्या आयुष्याच्या कमाईची वाताहत करून गेला. आजही अनेक जण निसर्गाने उद्ध्वस्त झालेले अद्याव सावरलेले नसले तरी सावरण्याचा प्रयत्न जिद्दीने करीत आहेत.
शासनाकडून मदतीचा हात -
निसर्ग चक्रीवादळ झाल्यानंतर शासनाने त्वरित मदतीचा हात पुढे केला. मुख्यमंत्री, मंत्री, नेते मंडळी रायगडाकडे धाव घेऊ लागले. शासनाने वादळात नुकसान झालेल्यासाठी 447 कोटी 86 लाख 96 हजार 40 रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केली. नुकसानग्रस्त नागरिकांना 348 कोटी 73 लाख 8 हजार 74 रुपये निधी वाटप केला. 99 कोटी 13 लाख 87 हजार 966 रुपये एवढा निधी शासनाकडे परत पाठविण्यात आला. नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाने मदतीचा हात केल्याने पुन्हा रायगडकर हे सावरले.
चक्रीवादळ अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती धोके निवारण प्रकल्पाना गती देण्याचा प्रयत्न -
जिल्ह्यात आलेल्या निसर्ग त्यानंतर तौक्ते चक्रीवादळामुळे राष्ट्रीय आपत्ती धोके निवारण प्रकल्पाना गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात 28 ठिकाणी निवारा शेड उभारण्यात येणार आहे. 924 ठिकाणी वीज रोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी 8 कोटी 31 लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आलेला आहे. किनारपट्टी भागातील शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले गेले आहे. गुरासांठीही निवारा शेड बांधण्यात येणार असून बंद असलेले 23 शासकीय गोदामे याची दुरुस्ती केली जाणार आहे. मुरुड, उरण, श्रीवर्धन येथे भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. उधाणाचे पाणी किनारपट्टी गावात घुसत असल्याने 27 ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे उभारण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. 20 संभाव्य दरदग्रस्त गावामध्ये रिटेनिग वॉल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. एन डी आर एफ केंद्र उभारणीसाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला असून यासाठी महाड येथे जागाही उपलब्ध केली असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे.