खालापूर(रायगड) - तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीत मोठमोठया सिनेअभिनेते - धनिकांचे फार्महाऊस व जमिनी असून, येथील काही धनिक मंडळी येथे व्यवसाय करून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच प्रकार कलोते अँनिमल शेल्टर या मालकांकडून होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याठिकाणी अनेक प्रकारची जनावरे व प्राण्यावर इलाज करून संगोपन करण्यात येत असताना या प्राण्यांचे मलमूत्र कलोते धरणाला जाऊन मिळणाऱ्या ओढ्याला सोडले जात आहे. त्यामुळे या मलमूत्रामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कलोतेमधील ग्रामस्थांनी एकत्र येत कलोते अँनिमल शेल्टरच्या मालकाला 31 मे रोजी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्या मालकांकडून उडावाउडावीची उत्तरे मिळाल्याने उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केला. तसेच हा जर मलमूत्र सोडण्याचा प्रकार थांबला नाही तर कलोतेकरांनी आंदोलनाचा पवित्रा उचलण्याचा निर्धार केला आहे.
नागरिकांच्या आरोग्यास धोका
कलोते परिसर निसर्ग सौंदर्याने सजल्याने या परिसराकडे साऱ्यांचे पाऊले आपोआप वळतात. या परिसरात मुंबई - पुणे व अन्य नामकिंत शहरातील धनिकांनी जमीन खरेदी करत आपले वास्तव्य निर्माण करत काहींनी आपला व्यवसाय सुरु केला आहे. काही व्यावसायिकांचा स्थानिक ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. असा त्रास कलोते अँनिमल शेल्टरच्या मालकांच्या व्यवसायातून होत असून, येथील मालक बाहेर गावातून डुक्कर, गाढव, घोडे, कुत्रे, बैल, गाय, माकड, शहाबृग अशा अनेक प्रकारची आजारी प्राणी याठिकाणी आणून त्यांच्यावर उपचार करतात. मात्र या सर्व प्राण्यांचे मलमूत्र हा मालक कलोते धरणाला जाऊन मिळणाऱ्या ओढ्याला सोडत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हा व्यवसाय बंद न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
कलोते धरणाच्या पाण्यावर काही गावांची पाणी योजना सुरू असल्याने हा प्राण्यांचा मलमूत्र आरोग्याला घातक धरु शकतो, त्यामुळे कलोते ग्रामस्थांनी एकत्र कलोते अँनिमल शेल्टरच्या मालकाला 31 मे रोजी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्या मालकांकडून उडावाउडवीची उत्तरे मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली असून, हा आरोग्यास धोका निर्माण करणारा उद्योग लवकर बंद न झाल्यास कलोतेमधील ग्रामस्थ आंदोलनाचे बंड पुकारणार आहेत, असे मत उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
याप्रसंगी कलोते ग्रामपंचायत सदस्य बळिराम ठोंबरे, सदस्या बेबीताई जाधव, सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव, नागेश ठोंबरे, कमलाकर बोराडे, मुकेश पाटील, दिपक पाटील, अनिल मालुसरे, दिपक काईनकर, नरेंद्र साळुके, तातुराम पाटील, रमाकांत पाटील, मोहन मोरे, सचिन ठोंबरे, राहुल ठोंबरे, प्रविण ठोंबरे आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व तरुण मंडळी उपस्थित होते. तर याबाबत व्यवसाय मालक समीर व्हराकडून ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली असून, व्यवसाय मालकाने याबाबत सविस्तर बोलण्यास टाळाटाळ केल्याने ग्रामस्थ संभ्रमात सापडले होते.