रायगड - खालापूर तालुक्यातील वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकरणी खालापूरच्या ग्रामस्थांनी तहसील कार्यलाय समोर एकत्र येऊन संताप व्यक्त केला. यावर खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी याची दखल घेत वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्याची ग्रामस्थांच्या उपस्थितीच बैठक बोलावून विजेच्या समस्येचा जाब विचारला. तसेच वीजपुरवठा खंडीत होण्यामागच्या कारणाचा शोध घेऊन त्याची दुरुस्ती करत वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत खालापूर ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे दिसून आले. खालापूर ग्रामस्थांनी खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांना देखील वीज वितरण विरोधात निवेदन दिले आहे.
विद्युत पुरवठा सुरळीत न ठेवल्यास आंदोलनाचा दिला इशारा
खालापूर तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात रात्री-बेरात्री तसेच दिवसाही विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढतच आहे. या प्रकारामुळे गृहिणींसह, ग्रामस्थ, तरुण व छोटछोट्या व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. मात्र, विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या शिवाय शेतीची कामेही खोळबत आहेत.
महावितरण कंपनीच्या या गलथान कारभाराबाबत ग्रामस्थामधून वारंवार नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अखेर शनिवारी संतापलेल्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर जाऊन वीज पुरवठ्याच्या समस्यांचा पाढाच वाचून दाखवला. त्यानंतर तहसीलदार चप्पलवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत जाब विचारला. यावेळी ग्रामस्थांनीही वीज वितरणात भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप केला.