रायगड - सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याप्रकरणी आज सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या खून खटल्यातील आरोपीवर आरोप निश्चित करण्याबाबत आज सुनावणी झाली. यामधील आरोपी विरोधात 302, 201, 120 (ब), 218, 417, 465, 468, 471 ही कलमे न्यायालयाने लावली आहेत. त्यामुळे या कलमाच्या आधारे आता खटल्याची पुढची सुनावणी होणार आहे. खटल्याची पुढची सुनावणी 4 जुलै रोजी होणार आहे.
अश्विनी बिद्रे खून प्रकरणाचा खटला अलिबाग सत्र न्यायाधीश आर. जी. मल्लशेट्टी यांच्या न्यायालयात सुरू आहे. या खटल्यामधील आरोपीवर आरोप निश्चित करण्याबाबतचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी आधीच्या सुनावणीवेळी केला होता. त्यावर न्यायालयाने आज आरोपी विरोधात संघटित होवून कट रचून खून करणे, पुरावा नष्ट करणे, फसवणूक करणे, खोटे पुरावे तयार करणे, पोलिसांची दिशाभूल करून तपासास अडथळा निर्माण करणे आदी आरोप निश्चित केले आहेत. आजच्या खटल्याला विशेष सरकारी वकील, आरोपी पक्षाचे वकील, पोलीस, आरोपी हजर होते.