रायगड - बालपणापासून जी भाषा ऐकत, बोलत मूल लहानाचे मोठे होते, ती भाषा त्याच्यासाठी मातृभाषा असते. स्वतःच्या भाषेतून संवाद साधणे, व्यक्त होणे हे स्वाभाविक आंनद देणारा क्षण असतो. आज 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. त्यानिमित्त रा. जि. प. शाळा चिंचवलीतर्फे आतोणे शाळेतील मुलांनी कातकरी भाषेत गोष्टी, लोकगीत गाऊन दिन साजरा केला. तीस लागणेल कावळा (तहानलेला कावळा) ही गोष्ट, एक रह लाकूडतोड्या (एक होता लाकूडतोड्या) हे कातकरी भाषेत गीत व लिंबू कापला हे लोकगीताचे गायन करून दिन साजरा केला.
मातृभाषा टिकवणे आजच्या काळात गरजेचे
आज 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून जगभर साजरा होत आहे. मातृभाषा म्हणजे बालपणापासून आपण जी भाषा घरात बोलतो ती भाषा. जगात अनेक बोलीभाषा असल्या तरी घरात आपण आपली मातृभाषाच वापरत असतो. त्यामुळे आपल्या मातृभाषेचा एक गोडवा असतो. समाजात वावरत असताना आपण इतर भाषेतही बोलचाली करीत असतो. मात्र मातृभाषेचा वापर हा आपण नेहमीच आपल्या माणसाबरोबर करीत असतो. मातृभाषा टिकवणे हे एक आपले कर्तव्य आहे. त्यातूनच 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा म्हणून साजरा केला जातो.
सादर केल्या आदिवासी मातृभाषेत लोकगीत आणि गोष्टी
रोहा तालुक्यातील चिंचवलीतर्फे आतोणे ही दुर्गम भागात असलेली आदिवासी शाळा आहे. कातकरी आणि आदिवासी ही येथील लोकांची मातृभाषा आहे. त्यामुळे आपल्या मातृभाषेत येथील विद्यार्थ्यांचा संवाद सुरू असतो. शाळेत जरी मराठी बोलीभाषा बोलली जात असली तरी स्वतःची असलेली मातृभाषा विद्यार्थ्यांना जवळची असते. आज जागतिक मातृभाषा दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक गजानन जाधव, उपशिक्षक श्री जगन्नाथ अब्दागिरे यांनी मातृभाषेचे महत्त्व मुलांना कळावे, यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या मातृभाषेत गोष्टी, लोकगीत गाऊन आजचा जागतिक मातृभाषा दिन साजरा केला आहे.