कर्जत (रायगड) - उल्हास नदीपात्रात वाहून गेलेल्या मुबंई येथील तरुणाचा मृतदेह सोमवारी (21 जून) पोलिसांना सापडला. 20 जूनला उशिरापर्यंत स्थानिकांच्या मदतीने नेरळ पोलिसांनी उल्हास नदीपात्रात तरुणाचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. सोमवारी या तरुणाचा बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावर मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडला. समीर देवळेकर, असे मृत तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - खालापूर पंचायत समितीच्या सभापतींना उपसभापतींच्या कॅबिनचा आधार!
मुंबई येथील आठ तरुणांचा समूह वर्षपर्यटनासाठी नेरळ-बिरदोली परिसरातील फार्महाऊसवर मौजमजा करण्यासाठी मुक्कामाला आला होता. ते पोलिसांची नजर चुकवून परिसरात आले होते. त्यांनी 20 जून रोजी फार्महाऊस जवळील उल्हासनदीवर मौजमजेचा बेत केला.
नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने उल्हासनदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला होता. या नदीत उतरण्याचा मोह आवरू न शकणाऱ्या समीर सतीश देवळेकर हा तरुण नदी पात्रात उतरताच वाहून गेला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मित्राला सुद्धा त्याला वाचवता आले नाही. यावेळी नेरळ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने पाण्यात शोध सुरू केला. परंतु, उशिरापर्यंत समीर कुठेही मिळून आला नाही. अंधार पडल्याने थांबवण्यात आलेली शोध मोहीम सोमवारी (21 जून) सकाळपासून सुरू केली असता बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावर समीरचा मृतदेह सापडून आला. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - रायगड : धनदांडगे हिरावून घेत आहेत दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या तोंडाचा घास; अमर वार्डेंचा आरोप