रायगड : खोपोलीजवळील जशनोव्हा फार्मा या केमिकल कंपनीमध्ये आज पहाटे तीनच्या दरम्यान स्फोट झाला. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील रिअॅक्टरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली.
चार किलोमीटरपर्यंत गेला आवाज..
हा स्फोट एवढा मोठा होता, की सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत याचा आवाज ऐकू आला. तर, एक किलोमीटरच्या परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याचे समजत आहे.
सुरक्षा रक्षकाची पत्नी ठार..
स्फोट झाल्यानंतर जशनोव्हा शेजारी असलेल्या पेट्रोसोल कंपनीतील सुरक्षा रक्षक राहत असलेल्या ठिकाणचे शेड कोसळले. यात एका सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर, मृत महिलेचा पती आणि तीन मुले जखमी झाली. आणखी एकाचा मृत्यू झाला असून, एक कामगार जखमी झाला. जखमींना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शेजारील लघु उद्योगांनाही फटका..
खालापूर तालुक्यातील खोपोली सजगाव परिसरात आर्कोस औद्योगिक क्षेत्र आहे. याठिकाणी जशनोव्हा फार्मा या कंपनीव्यतिरिक्त एस. एस. पेपर ट्यूब, पेन ट्यूब अशा इतर सहा कंपन्या आहेत. जशनोव्हामध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत शेजारील आणखी सहा लघु उद्योगांनाही या आगीचा फटका बसला.
चार तासानंतर आग आटोक्यात..
स्फोटाची माहिती मिळताच खोपोली नगरपरिषद, एचपीसीएल, रिलायन्स, उत्तम स्टील, टाटा स्टील, कर्जत नगरपरिषद, पेण नगरपरिषद असे आजूबाजूचे एकूण दहा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली.
हेही वाचा : कांजूरच्या कारशेडची जागा राज्य सरकारचीच! पर्यावरण प्रेमींचा पुराव्यासह दावा