रायगड - दुबई येथे सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे एक मोठे रॅकेट रायगड पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. या आरोपींना कर्जत, ठाणे आणि मुंबई परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.
आयपीएलच्या सामने सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात कुठे सट्टाबाजार सुरू आहे अथवा नाही याची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी हे निर्देश दिले होते. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जिल्ह्यातील विविध भागात शोध मोहीम सुरू केली. यात कर्जत तालुक्यातील एका युनिव्हर्स रिसॉर्टमध्ये सट्टा लावला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. याची पडताळणी करून पथकाने कर्जत येथील 007 युनिवर्स रिसॉर्टवर छापा टाकला.
ही टोळी आठ मोबाईल अॅप्लिकेशनच्या सहाय्याने सट्टा लावत होते. प्रत्येक सामन्यानंतर ठराविक पॉइंट्सच्या सट्टा लावणाऱ्यांना दिले जात होते. आठवड्यानंतर जमा झालेल्या पॉइंट्ससाठी सट्टा खेळणाऱ्यांना हवालामार्फत रोख रक्कम दिली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. यात चार मुख्य सट्टेबाजांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून 17 मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. तर आणखी चार जणांचा शोध सुरू आहे.