नवी मुंबई - बांगलादेशी व्यक्ती पनवेलमध्ये आला. लग्न केले आणि घरजावईही बनला. त्याला दोन मुलेही झाली. बांगलादेशी इनामुल मुल्लाचा मराठी मनोहर पवारही झाला. इतकेच नाहीतर रेशन कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड सर्व काही कागदपत्रे बनावट तयार केली आणि मराठी व्यक्ती म्हणून वास्तव्य करू लागला. शेवटी काय... पोलिसांना सुगावा लागला अन् त्याचा भांडाफोड झाला.
काही वर्षांपूर्वी इनामुल मुल्ला हा बांगलादेशी नागरिक पनवेलमधील चिखले गावात राहायला आला. त्याने याच गावातील सारिका गायकर या मुलीसोबत लग्न केले. घरजावई म्हणून राहू लागला. बांगलादेशी नागरिकत्वाची ओळख लपवण्यासाठी मनोहर पवार असे नावही ठेवले. त्याचा कागदोपत्री पुरावाही तयार करण्यात आला. त्याच्या नावावर चिखले येथे घरही आहे. त्याला पारस आणि श्लोक नावाची दोन मुले असून ती कोन येथील शाळेत शिक्षण घेत आहेत.
'असे' तयार केले कागदपत्र -
इनामुल म्हणजेच मनोहर राहू पवार याच्याकडे बोगस नावाने रेशनकार्ड, लायसन्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, स्थानिक वास्तव्याचा दाखला, वय, अधिवास याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान ओळखपत्र सर्व कागदपत्रे होती. पण त्यानी हे कागदपत्रे आणली कुठून? तर त्याची पत्नी चिखले येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत होती. पत्नीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची त्यानी फोटोकॉपी काढली. तिच्या नावावर व्हाईटनर लावले आणि स्वतःचे नाव टाकले. तसेच त्याने चिखले गावातच एक घर विकत घेतले. इतकेच नाहीतर रेशनकार्ड काढण्यासाठी अॅफिडेव्हीट दिले त्यावर गावातीलच एका व्यक्तीने मनोहर पवारला ओळखतो म्हणून सही देखील केली. अशाप्रकारे त्याने शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट सर्व कागदपत्रे तयार केली.
'असा' झाला भांडाफोड -
तो डिसेंबर महिन्यात बांगलादेशमध्ये १५ दिवसांसाठी गेला होता. यादरम्यान त्याच्या एका ओळखीच्या माणसाने तो बांगलादेशला गेला असल्याची चर्चा पोलिसांसोबत केली. त्यामुळे हा बांगलादेशला का गेला? आणि इतके दिवस का राहत आहे? याची चौकशी केली. तो परत आल्यानंतर त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले. तो मराठी नसल्याचा संशय येताच पोलिसांनी शासकीय कार्यालयांना पत्रे लिहून त्याची माहिती मागवली होती. त्यामध्ये चिखले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा शाळा सोडल्याचा दाखल होता. पोलिसांनी चौकशी केली असता, असा कुठला दाखल आम्ही दिलाच नसल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणूक व बनावट कागदपत्रे बनविल्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच त्याला अटक करण्यात आली. अशाप्रकारे बांगलादेशी घरजावयाचा भांडाफोड झाला. इनामुल मुल्लाचा मनोहर पवार बनवायला आणि बनावट कागदपत्रे तयार करायला मदत करणारी त्याची पत्नी सारिका गायकर, राहू पवार यांना अटक करण्यात आली.