रायगड - रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची अर्णब गोस्वामी यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने अर्णब गोस्वामी यांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विविध गुन्हे दाखल
रिपब्लिक वृत्तवाहिनीविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांकडून विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अलिबाग येथील अनव्य नाईक आत्महत्या प्रकरणातही जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र अर्णबसह दोघांविरोधात दाखल केले आहे. याविरोधात गोस्वामी यांच्या रिपब्लिकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
गुन्हे रद्द करण्याबाबत अर्णब गोस्वामींची सर्वोच्च न्यायालयात धाव
रिपब्लिकवरील दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याबाबत आणि तपास सीबीआयकडे देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंठपीठासमोर सुनावणीसाठी आली होती. न्यायालयाने रिपब्लिकविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीलाही न्यायालयाने नकार दिला. याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना स्थानिक न्यायालयात जाण्यास मूभा दिली आहे.
हेही वाचा - रुग्णांना बोगस लॅबमध्ये पाठवणाऱ्या डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या; देशात पहिल्यांदाच डॉक्टरचे निलंबन
अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत होणार वाढ
अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला असल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अलिबाग येथे अनव्य नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यामुळे या केसचा खटलाही सुरू होणार आहे. तर उर्वरित गुन्ह्यात आता अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.