मुंबई : राज्याच्या गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने काल (बुधवार) सकाळी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेतले. त्यानंतर रायगड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांना अलिबाग जिल्हा न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांच्यासह फिरोज शेख आणि नितिश सारडा यांनाही १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.
२०१८ सालच्या एका आत्महत्येच्या प्रकरणात रायगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केल्यानंतर त्यांना अलिबाग जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी सकृत दर्शनी पुरावा आढळला नाही. त्यामुळे सरकार पक्षाची पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली आणि अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण..
अलिबाग तालुक्यातील कावीर या गावात अन्वय नाईक याचे वडिलोपार्जित घर आहे. या घरात अन्वय नाईक याची आई कुमुद नाईक आणि अन्वय नाईक राहत होते. अन्वय नाईक यांचा मुंबई येथे घर सजावटीचा (इंटिरेअर डिझाईनिंग ) व्यवसाय होता. या व्यवसायातील उधारी वसूल न झाल्याने नाईक यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. त्यामुळे घेणेकरी यांनी पैशाचा तगादा लावला होता. याला कंटाळून 5 मे 2018 रोजी आपल्या घरी गळफास घेऊन आई आणि मुलाने आत्महत्या केली. त्यावेळी मृत्यूपूर्वी नाईक यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये अर्णब गोस्वामीने पैसे थकवल्याचा आरोप अन्वय नाईकने केला होता. अर्णबने आपले ५.४० कोटी रुपये थकवल्यामुळे आपण आर्थिक संकटात आल्याचा या चिठ्ठीत उल्लेख होता. त्यामुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी अली होती.
पुन्हा तपास सुरू करण्याची मुलीने केली मागणी
अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाचा तपास हा अलिबाग पोलिसांनी केला होता. या प्रकरणात अलिबाग पोलिस स्टेशनमध्ये गु.र.नं. 59/2018, भादंवि 306,34 प्रमाणे तसेच गु.र.नं. 114/ 2018 भांदवि कलम 302 प्रमाणे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारीमध्ये अन्वय नाईक यांच्या मुलीने अर्णव गोस्वामी यांनी त्यांच्या वडिलांच्या कामाचे पैसे न दिल्याने त्यांचे वडील व आजीने आत्महत्या केल्याचे म्हटले होते. दरम्यान, करण्यात आलेल्या तपासापासून आपण असमाधानी असल्याने गुन्हेगारी प्रक्रिया संहीता (सि.आर.पी.सी) मधील कलम १७३ (८) मधील अधिकाराचा वापर करुन हे प्रकरण राज्य अन्वेषण विभाग अथवा गुन्हे शाखेकडे वर्ग करावे. तसेच तत्कालीन संबंधित तपास अधिकारी व इतर शासकीय अधिकारी, न्यायीक अधिकारी यांचे विरुध्द चौकशी करण्यात यावी, अशी विनंती अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा नाईक यांनी गुहमंत्री अनिल देशमुख यांना दिलेल्या निवेदनातून केली होती.
सीआयडी चौकशीचे आदेश..
२०२०च्या मे महिन्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. अन्वय नाईक यांची मुलगी अज्ञा नाईकच्या मागणीवरुन हे आदेश देण्यात आले होते. अलीबाग पोलिसांनी याप्रकरणी अर्णब गोस्वामीचा तपास केला नसल्याचा आरोप अज्ञा यांनी केला होता.