रायगड - अन्वय नाईक आत्महत्या खटल्याची सुनावणी आज अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी सूनयना पिंगळे यांच्या न्यायालयात सुरू होती. यावेळी अर्णबसह दोघे सुनावणीवेळी गैरहजर होते. त्यामुळे 10 मार्च रोजीच्या तारखेवेळी तिन्ही आरोपी न्यायालयासमोर हजर राहण्याचे कडक आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपी हजर न राहिल्यास तीनही आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असे निर्देश मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच हा खटला सत्र न्यायालयात वर्ग करण्याबाबत अर्ज न्यायालयाकडे केला असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी दिली. त्यामुळे अर्णब गोस्वामीसह फिरोज शेख, नितेश सरडा यांना 10 मार्चच्या सुनावणीवेळी हजर राहावे लागणार आहे.
अर्णबसह दोघेही सुनावणीवेळी गैरहजर -
रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात नव्याने दोषारोपपत्र 4 डिसेंबर रोजी दाखल केले होते. यावेळी अर्णब गोस्वामीसह फिरोज शेख, नितेश सरडा यांना 7 जानेवारी रोजी सुनावणी वेळी हजर राहण्याचे समन्स न्यायालयाने दिले होते. मात्र 7 जानेवारी रोजी तीनही आरोपी गैरहजर राहिले होते. आज 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी तीनही आरोपीच्या वकिलांनी आरोपीना गैरहजर राहण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
10 मार्चला हजर राहण्याचे न्यायालयाचे निर्देश, अन्यथा कारवाई -
अन्वय नाईक प्रकरणातील तिसरा आरोपी नितेश सरडा यांच्यातर्फे वकिलांनी सत्र न्यायालयात अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातून मुक्तता करावी, यासाठी फेरविचार अर्ज दाखल केलेला आहे. या अर्जावर न्यायालयात 20 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाने सत्र न्यायालयात खटला वर्ग करण्यासाठी 10 मार्च ही पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. 10 मार्च रोजी अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हजर न राहिल्यास त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे निर्देश आज न्यायालयाने दिले आहेत. आज न्यायालयात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी काम पाहिले. तर आरोपी पक्षातर्फे संजोग परब यांनी काम पाहिले.