रायगड - तीस हजारांची लाच घेताना वडखळ वनपरिक्षेत्र ललिता सुभाष सूर्यवंशी या महिला अधिकाऱ्यास अलिबाग लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. तिच्यासोबतच गडबचे वनपाल बापू बिरू गडदे यालाही रंगेहात पकडण्यात आले आहे. ललिता सूर्यवंशी हिची अधिक चौकशी सुरू आहे.
तक्रारदार हे लाकडी फर्निचर बनवण्याचे काम करतात. फर्निचर तयार करण्यासाठी त्यांनी खेड येथील भरत सॉ-मिल मधून लाकडे आणली होती.
या खरेदी केलेल्या लाकडांचा साठा करण्याचा परवाना न घेता तक्रारदार इतर चार कामगार काम करतात म्हणून ललिता सूर्यवंशी हिने पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तडजोड झाल्यानंतर तीस हजार देण्याचे ठरले. यानंतर आज गुरुवारी तीस हजार रुपये स्वीकारताना तिला रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
याचसोबत गडब येथील वनपाल बापू बिरू गडदे याने देखील तक्रारदारांवर कारवाई न करण्यासाठी वीस हजारांची लाच मागितली होती. त्यालाही अटक करण्यात आली आहे. पोलीस उप-अधीक्षक अधिकराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर साळे अधिक तपास करत आहेत.