पनवेल - पनवेल महापालिकेच्या भाजप नगरसेवकाने मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. प्रशांत जाधव असे जखमी मनसे कार्यकर्त्याचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी आज एम. जी. एम. रूग्णालयात त्यांची भेट घेतली.
मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ते जाधव यांनी हे पैसे पकडून दिल्याची माहिती चिपळेकर यांना समजली होती. त्यामुळे त्यांनी २९ एप्रिलला मतदान संपल्यानंतर कट रचून जाधव यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नगरसेवक विजय चिपळेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी आज कामोठेतील एम. जी. एम. रुग्णालयात जाधव यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच यावेळी त्यांनी प्रशांत जाधव यांच्या कुटुंबीयांना धीर दिला तर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली. दरम्यान, याप्रकरणात पोलीस योग्य तपास आणि कार्यवाही करीत नसल्याचा आरोप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.
हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंदिस्त झाला आहे. दरम्यान, भाजपच्या या नगरसेवकावर आणखी काही गुन्हे दाखल आहेत का, याची चौकशी पोलीस करत आहेत.