रायगड - अलिबागमध्ये होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या कामाच्या बांधकामासाठी जागा घेण्याच्या कामाला गती देण्यात यावी, अशा सुचना पवार त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे अलिबागमध्ये होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाकाजाच्या हालचालींना वेग येणार आहे.
मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली रायगड येथील वैद्यकीय महाविद्यालय जागेसंदर्भात बैठक झाली. यावेळी अजित पवार म्हणाले की, रायगड येथील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयासाठी अंदाजे 25 एकर जागा लागणार आहे. रायगड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत 6 हेक्टर जागा आतापर्यंत उपलब्ध असून ती जागा देण्यास त्यांनी सहमती दर्शविली आहे. तसेच उर्वरीत जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अखत्यारित असल्याने जागा अधिग्रहणाबाबतची कार्यवाही महसूल विभागाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या समन्वयाने करुन घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
रायगड येथील अलिबाग येथे केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांप्रमाणे 100 प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांचे संलग्नीत रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. या बैठकीला खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी, आदी उपस्थित होते.
प्रस्तावित असलेल्या अलिबागमधील वैद्यकीय महाविद्यालयाला काही वर्षांपूर्वी राजकीय अनास्थेमुळे उभे राहण्यास अडथळा आला होता. मात्र, आता पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयासाठी हालचाली सुरू झाल्याने अलिबागसह रायगडकरांच्या आशा उंचावल्या आहेत.