रायगड- नुकताच झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सर्वत्र मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याच्या, सुपारीच्या व इतर बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रातील झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आलेल्या कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी पेण तालुक्यातील जिते येथील शेतकरी काशिनाथ चांगू म्हात्रे यांच्या नुकसानग्रस्त आंबा बागेची पाहणी केली.
या भेटीदरम्यान काशिनाथ म्हात्रे यांच्या बागेतील 17 आंब्याची झाडे व नारळाची 8 झाडे मुळासकट उन्मळून पडली असल्याचे निदर्शनास आले. या सर्व नुकसानीची पाहणी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.
तसेच निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासन लवकरच योग्य तो निर्णय घेईल, असेही भुसे यांनी सांगितले. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, जिते सरपंच अंजना विलास म्हात्रे, शेतकरी काशीनाथ चांगू म्हात्रे, दिलीप मधुकर म्हात्रे, चिंतामण शंभाे म्हात्रे आदी उपस्थित होते.