रायगड - अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. विक्रमजीत पडोळे यांना रुग्णाच्या नातेवाईकाच्या मित्राने कोविड सेंटरमध्ये धक्काबुक्की करून डॉक्टरांना शिवीगाळ केल्याची घटना 8 जून रोजी घडली होती. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना रात्री 9 वाजल्यानंतर येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, नातेवाईक त्यांच्या रुग्णाला व्हाट्सअॅप कॉलद्वारे संपर्क करू शकतात.
'अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा'
'जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराने रुग्णालय प्रशासनाने डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक निर्बंध लावले आहेत. कोविड सेंटरमध्ये रात्री 9 वाजता दरवाजे बंद केले जाणार आहेत. नातेवाईकांना आत प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, नातेवाईकांना त्यांच्या रुग्णाला व्हाट्सअॅप कॉलद्वारे संपर्क करण्यास परवानगी असणार आहे. नातेवाईकांना काही अडचण असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. कोरोनाच्या या काळात आपण आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे', असे आवाहन जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी केले आहे. दरम्यान, कोविड सेंटरबाहेर पोलीस आणि रुग्णालय सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
'डॉक्टरांना धक्काबुक्की करू नका'
'कोरोना काळात शासकीय डॉक्टर कोरोना रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. डॉक्टरही स्वतः कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनामुक्त होऊन पुन्हा रुग्णाच्या सेवेत दाखल होत आहेत. कोरोना रुग्णाला बरे करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असताना काही रुग्ण कोरोनाने मृत्यू पावत आहेत. त्याचे खापर डॉक्टरांवर फोडले जात आहे. त्यामुळे डॉक्टरांना मारहाण, शिवीगाळ, धक्काबुक्की केली जात आहे. या प्रकाराने डॉक्टरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनीही समजूतदारपणा दाखवणे गरजेचे आहे', असेही सुहास माने यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Mumbai Rain Live : पावसाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे रवाना