रायगड - विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुकीसाठी मतदानाचे साहित्य वाटप कर्मचारी व अधिकारी वर्गाकडे केले. यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. तर निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा - प्लास्टिकमुक्त पालिका मुख्यालय करण्यासाठी पनवेल महापालिकेत अनोखी मोहीम
विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होत आहे. जिल्ह्यात 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. 7 विधानसभा मतदारसंघात 22 लाख 66 हजार 679 मतदार असून 2 हजार 714 मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत ईव्हीएम मशीन व मतदानाचे साहित्य मतदान केंद्रानिहाय वाटप करण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी हे दिलेले साहित्य तपासून घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले.
मतदान केंद्रापर्यंत मतदान साहित्य व कर्मचारी, अधिकारी यांना पोहोचविण्यासाठी एसटी बसेसची सुविधा प्रशासनाने केली होती. मतदान केंद्रावर जाणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांना मतदान साहित्यासोबत ब्रश, साबण, टूथपेस्ट, मच्छर उदबत्ती, तेल या किटचे वाटपही करण्यात आले.