रायगड - बलात्काराचा गुन्हा करणाऱ्या आरोपींना जामीन मिळता कामा नये, पेणमधील चिमुरड्या मुलीवर बलात्कार करून तिची झालेली हत्या मानवतेला कलंक फासणारी घटना आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. या गुन्ह्यातील आरोपीला या आधी बलात्काराच्याच गुन्ह्यात शिक्षा झालेली आहे. तो जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याने मानवतेला काळिमा फासणारा बलात्कार आणि हत्येचा गुन्हा केला. त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपींना जामीन मिळता कामा नये तसेच या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करावी, यासाठी गृहमंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची अमानुष घटना घडली. त्या मुलीच्या कुटुंबीयांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली
पीडित कुटुंबाला 8 लाखाची मदत आणि वडिलांना शासकीय नोकरी द्या -
पीडित मुलीच्या कुटुंबीयांना अॅट्रोसिटी कायद्याच्या तरतुदीनुसार त्वरित 8 लाख 25 हजार रुपयांची मदत शासनाने द्यावी. मुलीच्या वडिलांना शासकीय नोकरी द्यावी, तसेच या कुटुंबीयांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर द्यावे, असे निर्देश रामदास आठवले यांनी प्रशासनाला दिले. बलात्कार गुन्ह्यातील पीडितेला मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत दिली जाते, त्याची रक्कम राज्य शासनातर्फे अनेक प्रकरणांत दिली जात नसून त्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठविणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले. आदिवासी गावठाण भोवती संरक्षक भिंत बांधण्याची सूचनाही रामदास आठवले यांनी प्रशासनाला केली.