रायगड -जमीन खरेदीचे दस्त नोंदणी करण्यासाठी पाच लाखाची लाच मागणे खालापूर दुय्यम निबंधकाला महागात पडले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एक लाखाची लाच घेताना दुय्यम निबंधकाला रंगेहात पकडले आहे. सुरेंद्र शिवराम गुप्ते (53) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचखोर अधिकाऱ्याला खालापूर न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
खालापूर तालुक्यात तक्रारदाराने जमीन खरेदी केली आहे. या जमिनीवर तक्रारदार आणि कुटुंबाची दस्त खरेदी नोंद करायची होती. तक्रारदार हे खालापूर दुय्यम निबंधक सुरेंद्र गुप्ते यांच्याकडे गेले होते. यावेळी आरोपी सुरेंद्र गुप्ते याने दस्त खरेदी नोंद करण्यासाठी पाच लाखाच्या लाचेची मागणी केली. अखेर तडजोडीअंती साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पहिला एक लाखाचा हफ्ता घेताना गुप्ते याला एसबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
हेही वाचा-मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीच्या खेरवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या
एक लाखाची लाच स्वीकारताना हॉटेलात दुय्यम निबंधकाला अटक
तक्रारदार यांनी गुप्ते यांनी मागितलेल्या लाचेप्रकरणी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदार याच्या तक्रारीनुसार चौक येथील स्वराज्य हॉटेलात सापळा रचला. आरोपी सुरेंद्र गुप्ते हे 21 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास स्वराज्य हॉटेलात आले. त्यानंतर तक्रारदार याच्याकडून एक लाखाची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. सुरेंद्र गुप्ते याला आज खालापूर न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
हेही वाचा-बार्शीत बेरोजगार तरुणांची १ कोटी ४३ लाख रुपयांची फसवणूक
या पथकाने केली कारवाई-
पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस हवालदार दीपक मोरे, बळीराम पाटील, विशाल शिर्के, विश्वास गंभीर, पोलीस नाईक सुरज पाटील या पथकाने उप पोलीस अधीक्षक सुषमा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.