रायगड - महाड ते रायगड किल्ल्यापर्यंतच्या मार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र, हे काम सुरू करताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या तब्बल ४ हजार झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. यापैकी काही झाडांची कत्तलही करण्यात आली आहे. याबाबत हिरवळ प्रतिष्ठान आणि वृक्षप्रेमींनी यावर आक्षेप घेतला आहे. आज शिवजयंतीच्या दिवशी पाचाड येथे हिरवळ प्रतिष्ठानतर्फे झाडांना 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचे आज्ञापत्र आणि वृक्षरक्षाबंधन बांधून वृक्षाचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे. वृक्षप्रेमी, शालेय विद्यार्थी, कॉलेज विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किल्ले रायगड विकास प्राधिकरण अंतर्गत 650 कोटी रुपयांच्या निधीमधून रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचे काम केले जात आहे. यामध्ये महाड ते रायगड किल्ला या 24 किमी रस्त्याचे 137 कोटीचे रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. रायगड किल्ला पाहण्यासाठी लाखो शिवभक्त येत असल्याने महाड ते रायगड हा रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम रायगड प्राधिकरण अंतर्गत घेण्यात आलेले आहे. रस्ता रुंदीकरण कामामध्ये दुतर्फा असलेली झाडे तोडली जाणार आहेत. हे काम सुरू झाले असताना काही झाडांची कत्तलही केली आहे. याबाबत वृक्षप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
विकास होणे गरजेचे आहे या मताशी वृक्षप्रेमी हे सहमत असले तरी वृक्ष तोडणे हे पर्यावरणाला घातक आहे, अशी धारणा वृक्षप्रेमींची आहे. वृक्ष जतन करण्यासाठी आणि वृक्षाची कत्तल होऊ नये यासाठी हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवजयंती दिवशी पाचाड येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञापत्र आणि वृक्षबंधन बांधले आहे. रस्ता रुंदीकरण करताना झाडं वाचवा, अशी भावना या वृक्षप्रेमींचे आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे शासन वृक्षप्रेमींची भावना सांभाळणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.
हेही वाचा -
'केंद्र सरकारकडून राज्य सरकारने गडकिल्ले आपल्या अखत्यारित घ्यावे'